Tuesday, January 10, 2012

गाऱ्हाणं

देवा, मला माहित नाही की माझं हे गाऱ्हाणं ऐकायला तू अस्तित्वात आहेस तरी का. पण असलास तर मी तुझ्यावर खूप रागावलेय. असं का होतं की एखाद्याच्या आयुष्यात सगळं चांगलं होतं. ती व्यक्ती जन्मतःच बुद्धिमान असते अथवा कुठलं तरी कौशल्य अंगी असतं. त्यांचं आयुष्य चार-चौघां सारखं व्यवस्थित जातं. म्हणजे की मनासारखं शिक्षण होतं, हवी तशी नोकरी मिळते, हवा तसा जोडीदार मिळतो. मूल हवं असल्यास मुले ही होतात. आणि मुलं पण चांगली निघतात. मात्र एखाद्याला ह्या गोष्टी मिळायला खूप त्रासातून जावं लागतं. आणि मनासारखं मिळतंच असं नाही. बहुसंख्य लोकांना ज्या गोष्टी सहज मिळतात, त्या गोष्टी काहींना मिळतंच नाहीत.

तू म्हणशील की "माझा मानस (plan) च तसा होता. जन्म देतांना मी कुठलेही वचन दिले नाही की तुझे आयुष्य छान जाईल. सगळ्यान सारखे जाईल. तुला हव्या त्या गोष्टी मिळतील. तू उगाच गृहित धरत होतास ह्या सगळ्या गोष्टी. तुझे आयुष्य आनंदी नसेलही कदाचित. पण तुला ते आनंदी करावे लागेल. जर तुला काही गोष्टी मिळाल्या नसतील तर त्या बद्दल विसरावे लागेल". मान्य आहे मला हे, कि प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते आणि प्रत्येकाने आपले आयुष्य अधिक चांगले करायचे असते. सकारात्मक वृत्ती ठेवून जगायचे असते इ. इ. अरे, पण मग अशा लोकांना कमीत कमी हि सकारात्मक वृत्ती आत्मसात करायची शक्ती तरी द्यायची. चार-चौघां पेक्षा त्यांच्यात अधिक सहनशक्ती तरी हवी. अधिक सकारात्मक दृष्टीकोन हवा. ज्या गोष्टी मिळत नसतील त्या प्राप्त करण्याची इच्छा ठेवून जर जगत राहिलात, तर आयुष्य भर तुम्हाला वाईट वाटेल. त्यापेक्षा त्या गोष्टी सोडून देऊन दुसऱ्या गोष्टी च्या मागे लागावे. अरे, पण जर का ही गोष्ट म्हणजे एक जोडीदार असेल, तर? आपल्याला जोडीदार मिळावा हि इच्छा काय जगावेगळी आहे काय? जगतांना आपल्या सुख-दुःखात सोबती असावा असं नाही का वाटत प्रत्येकाला? ही रास्त मागणी नाहीये का? माझ्या बहिणीची हीच इच्छा आहे रे. मी स्वतः जर लग्न केलेय तर मी कसं सांगू शकेन तिला कि एकट रहा. आणि त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. होईल का तिची इच्छा पूर्ण? मिळेल का तिला मनासारखा जोडीदार?

तराजूतले आयुष्य

आयुष्य म्हणजे आहे तरी काय? आयुष्य हा एक चढ-उतार असलेला, कधी डोंगरावरचा तर कधी दरी तला, कधी उन्हातला तर कधी पावसा मधला रस्ता आहे. आणि प्रत्येकाचा रस्ता हा वेगळा आहे. अनेक छोट्या छोट्या वाटा मिळून हा रस्ता तयार होतो. कधी आपण आपली वाट निवडतो तर कधी आपल्याला नकळत एखादी वाट खेचून घेते. प्रत्येक जण वेगळ्याच ठिकाणी सुरुवात करतो आणि वेगळ्याच ठिकाणी शेवट. रस्त्यावर चालतांना बरेच सोबती भेटतात. आणि तेवढा वेळ आपला प्रवास सुखकर करतात.

मात्र एक कोडं मला उलगत नाही ... जर प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, तर अमक्याचा मार्ग तमक्या पेक्षा चांगला, असं कसं म्हणता येईल? दोन व्यक्ती चे आयुष्य तोलता कसे येईल? व्यक्ती वेगळ्या, त्यांचा रस्ता वेगळा, त्यांना येणारे चढ-उतार वेगळे. मग त्यांच्यात तुलना कशाला करायची? पण लहान पणा पासून, म्हणजे शाळा सुरु झाल्या पासून आपल्याला तुलना करायला शिकवतात.. किंवा भाग पाडतात. शाळेत दुसऱ्या पेक्षा तुला गुण जास्त मिळाले ना, त्यामुळे तू हुशार. किंवा दुसऱ्या पेक्षा तुला गाणे, चित्र, अभिनय, खेळ इ. इ. मध्ये तुझे कौशल्य चांगले ना, त्यामुळे तू चांगला. तुमचा अहंकार ह्या "पेक्षा" मुळे दुणावतो. आणि मग आयुष्यभर तुम्ही स्वतःला तराजूत तोलत असता.. तुलना करण्याचे परिमाण बदलत असते .. शारीरिक सौंदर्य, बौद्धिक क्षमता, कुठल्या कलेतील कौशल्य, कमावलेला पैसा, घर, दु/चार चाकी, तुमचा/ची सहचर, तुमची मुले, इतकेच काय, तुमचे Facebook वरचे प्रतिबिंब. आणि मग प्रत्येक बाबतीत माझेच कसे चांगले हे दाखवण्याचा माणसाचा अट्टाहास असतो. पण प्रत्येक बाबतीत तुमचेच चांगले असूच शकत नाही. मग ज्या बाबतीत माझे चांगले नाही त्याबद्दल दुःख करत बसायचे काय? की मोठ्या मनाने ते स्वीकारायचे?

किंवा तुलनाच करणे बंद केले तर? तर प्रत्येकाचा मार्ग जास्त आनंददायी नाही होणार का?