Tuesday, January 10, 2012

गाऱ्हाणं

देवा, मला माहित नाही की माझं हे गाऱ्हाणं ऐकायला तू अस्तित्वात आहेस तरी का. पण असलास तर मी तुझ्यावर खूप रागावलेय. असं का होतं की एखाद्याच्या आयुष्यात सगळं चांगलं होतं. ती व्यक्ती जन्मतःच बुद्धिमान असते अथवा कुठलं तरी कौशल्य अंगी असतं. त्यांचं आयुष्य चार-चौघां सारखं व्यवस्थित जातं. म्हणजे की मनासारखं शिक्षण होतं, हवी तशी नोकरी मिळते, हवा तसा जोडीदार मिळतो. मूल हवं असल्यास मुले ही होतात. आणि मुलं पण चांगली निघतात. मात्र एखाद्याला ह्या गोष्टी मिळायला खूप त्रासातून जावं लागतं. आणि मनासारखं मिळतंच असं नाही. बहुसंख्य लोकांना ज्या गोष्टी सहज मिळतात, त्या गोष्टी काहींना मिळतंच नाहीत.

तू म्हणशील की "माझा मानस (plan) च तसा होता. जन्म देतांना मी कुठलेही वचन दिले नाही की तुझे आयुष्य छान जाईल. सगळ्यान सारखे जाईल. तुला हव्या त्या गोष्टी मिळतील. तू उगाच गृहित धरत होतास ह्या सगळ्या गोष्टी. तुझे आयुष्य आनंदी नसेलही कदाचित. पण तुला ते आनंदी करावे लागेल. जर तुला काही गोष्टी मिळाल्या नसतील तर त्या बद्दल विसरावे लागेल". मान्य आहे मला हे, कि प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते आणि प्रत्येकाने आपले आयुष्य अधिक चांगले करायचे असते. सकारात्मक वृत्ती ठेवून जगायचे असते इ. इ. अरे, पण मग अशा लोकांना कमीत कमी हि सकारात्मक वृत्ती आत्मसात करायची शक्ती तरी द्यायची. चार-चौघां पेक्षा त्यांच्यात अधिक सहनशक्ती तरी हवी. अधिक सकारात्मक दृष्टीकोन हवा. ज्या गोष्टी मिळत नसतील त्या प्राप्त करण्याची इच्छा ठेवून जर जगत राहिलात, तर आयुष्य भर तुम्हाला वाईट वाटेल. त्यापेक्षा त्या गोष्टी सोडून देऊन दुसऱ्या गोष्टी च्या मागे लागावे. अरे, पण जर का ही गोष्ट म्हणजे एक जोडीदार असेल, तर? आपल्याला जोडीदार मिळावा हि इच्छा काय जगावेगळी आहे काय? जगतांना आपल्या सुख-दुःखात सोबती असावा असं नाही का वाटत प्रत्येकाला? ही रास्त मागणी नाहीये का? माझ्या बहिणीची हीच इच्छा आहे रे. मी स्वतः जर लग्न केलेय तर मी कसं सांगू शकेन तिला कि एकट रहा. आणि त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. होईल का तिची इच्छा पूर्ण? मिळेल का तिला मनासारखा जोडीदार?

No comments: